फुले पिंपळगावात रस्त्याचे बोगस काम
- काम बंद करून बिले अदा करू नयेत
- ग्रामस्थांचे गटविकास अधिका-यांकडे मागणी
------
माजलगाव, प्रतिनिधी: शहरपासुन जवळच असलेल्या फुलेपिंपळगावात सिमेंट रस्त्याचे बोगस काम होत असल्याने हे काम बंद करून झालेल्या कामाची बिले सदरील गुत्तेदारास अदा करू नयेत यासह इतर मागण्यांचे निवेदन गटविकास अधिका-यांना ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, फुलेपिंपळगाव ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपल्याने प्रशासक म्हणुन ग्रामसेवकास नेमलेले आहेत. हे ग्रामसेवक मनमानी कारभार करत असुन डीपीडीसी जनसुविधा अंतर्गत गावातील भिमराव हिवाळे यांचे घर ते पिलाजी वामन यांच्या घरापर्यंत रस्ता काम होते परंतु मध्येच बाबुभाई यांच्या घरापर्यंतचे काम करण्यात आले व पुढील काम तसेच अर्धवट ठेवले आहे. या कामात अटी डावलून रस्त्याचे काम पूर्णतः बोगस होत आहे. प्रशासक म्हणुन असलेले ग्रामसेवक, उपअभियंता तसेच गुत्तेदार यांच्या संगणमताने बोगसरित्या काम करून भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप करत दोन्ही रस्त्याचे कामे अंदाजपत्रकाप्रमाणे होत नसून सदरच्या कामात नियम व अटींना धाब्यावर बसवून येथील जनतेची व शासनाची फसवणूक होत आहे. तसेच सदरील कामात खडी, सिमेंट व वाळूचा वापर करणे बंधनकारक असतांना या कामात वाळूचा वापर न करता डष्ट वापरून काम निकृष्ट् दर्जाचे होत असल्याने सदरील गुत्तेदाराचे हे काम बंद करून बिले अदा करू नयेत अशी मागणी करण्यात आले आहे. निवेदनावर समदखॉं हमीदखॉं पठाण, रामेश्वर साळवे, भिमराव हिवाळे, जानू शेख यांचेसह ग्रामस्थांच्या स्वाक्ष-या आहेत. दरम्यान रस्ता कामाची तात्काळ चौकशी करण्यात यावी अन्यथा आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.