खा.प्रितमताई मुंडे यांच्या अभ्यासू आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याने रेल्वे कृती समिती आश्वस्त
रेल्वेसाठी अर्थसंकल्पात चारशे कोटींची तरतूद ; कृती समितीने मानले खा.ताईंचे आभार
बीडकरांच अनेक दशकांपासूनच रेल्वेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी खा.प्रितमताई मुंडे केंद्र आणि राज्य सरकारकडे सातत्याने अभ्यासपूर्ण पाठपुरावा करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांचा परिपाक रेल्वे प्रकल्पाच्या गतिशील उभारणीतून दिसतो आहे. रेल्वे कृती समितीला देखील त्यांच्या रेल्वेविषयक जिव्हाळ्याच्या काल प्रत्यय आला, नगर-बीड-परळी रेल्वे विषयक सर्व बाबींचा सखोल अभ्यास, प्रकल्पाच्या प्रगतीची मुद्देसूद मांडणी आणि भूसंपादन व निधी बाबतच्या पूर्ण माहितीनिशी अभ्यासपूर्ण मांडणीने कृती समितीला त्यांच्या विविध मागण्यांबाबत आश्वस्त केले.
बीड येथे भाजपच्या जिल्हा कार्यालयात काल माजी सैनिकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी रेल्वे कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नगर-बीड-परळी रेल्वे संदर्भात विविध मागण्यांचे निवेदन देऊन खा.प्रितमताई मुंडे यांच्या समक्ष मागण्यांची मांडणी केली. यावेळी कृती समितीच्या मागण्यांवर खा.प्रितमताई मुंडे यांनी अतिशय अभ्यासपूर्ण भूमिका मांडली, रेल्वे बाबत असलेली त्यांची विशेषज्ञता कृती समितीला आश्वस्त करत असताना जिल्ह्याच्या क्षितिजावर रेल्वे धावणारच हा विश्वास देत होती.
यंदाच्या वार्षिक अर्थसंकल्पात रेल्वेसाठी चारशे कोटींची तरतूद केल्याबद्दल कृती समितीने याप्रसंगी खा.प्रितमताई मुंडे यांचे आभार मानले, त्यांच्या सत्काराला उत्तर देताना खा.प्रितमताई म्हणाल्या की रेल्वे कृती समितीने २०१४ पासून मला वारंवार मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनात रेल्वेचा प्रश्न हाताळताना मी कधीही श्रेय घेण्याचा प्रयत्न केला नाही. रेल्वे प्रकल्पाची आजची गती समाधानकारक आहे, प्रकल्प ज्या गतीने आज पूर्णत्वाकडे जातो आहे त्या गतीने पुढील वर्षभराच्या काळात रेल्वे बीडपर्यंत नक्की धावेल, त्यादृष्टीने मी पाठपुरावा देखील करत असल्याचे त्यांनी सांगितले.
या रेल्वे प्रकल्पाची किंमत अठ्ठावीसशे कोटीवरून पाच हजार कोटीपर्यंत वाढल्यानंतरही निधीची कधीही कमतरता भासू दिली नाही. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर प्रकल्पाच्या कामात काही काळ खीळ बसली होती, परंतु आमचं सरकार सत्तेत येताच राज्याकडून दोनशे कोटी मंजूर करून घेतले आणि निधीचा अनुशेष भरून काढल्याचे खा.प्रितमताई मुंडे यांनी सांगितले. तसेच रेल्वे प्रकल्पाच्या कामात भूसंपादनाची प्रक्रिया विलंब करणारी ठरू नये म्हणून वेळोवेळी संबंधित विभागाच्या संयुक्त बैठकी घेऊन अडचणी सोडवण्यावर भर दिला, त्याचाच परिपाक म्हणून भूसंपादनाची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. रेल्वे कृती समितीने मांडलेल्या मागण्यांबाबत रेल्वे विभाग आणि संबंधित विभागांना सुचित करणार आहे, कृती समितीने निश्चिंत राहावे, रेल्वे आणणे माझे कर्तव्य आहे आणि या कर्तव्याशी मी वचनबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, कृती समितीचे नामदेव क्षीरसागर, जवाहरलाल सारडा, सत्यनारायण लाहोटी, रामचंद्र जोशी, अरुण नाना डाके, दिलीपसेठ लोढा, भाजप नेते सर्जेराव तांदळे, देवीदास नागरगोजे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.