प्रा. श्याम मानव म्हणाले, धीरेंद्र कृष्ण, बागेश्वर धाम, जिल्हा छत्तरपूर, मध्य प्रदेश यांनी दिव्य दरबारात केलेल्या ‘चमत्कारिक दाव्यासंबंधी’ ‘जादूटोणा विरोधी कायदा २०१३ व ड्रग अँड मॅजिक रेमेडिज ॲक्ट – १९५४ या दोन्ही कायद्यांनुसार गुन्हा ठरू शकणारे दिव्य दरबार व्हिडीओज (युट्युबवर उपलब्ध असलेले) व नागपुरातील कार्यक्रमांमधील सारे पुरावे लिखित स्वरूपात व व्हिडीओ स्वरूपात ८ जानेवारी २०२३ ला कार्यवाही करण्याच्या विनंतीसह वरिष्ठ पोलिसांना दिले. परंतु, तीन दिवस लोटूनही साधा गुन्हा दाखल झाला नाही.
दिव्यशक्ती स्वत: असल्याचा दावा जाहीररीत्या करणारे धीरेंद्र कृष्णांनी पळ काढला असल्यामुळे ते भोंदू आहेत, हे सर्व जनतेने ओळखावे व स्वत:ला फसवणुकीपासून वाचवावे. दिव्यशक्तीच्या दाव्यांना फसू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. पत्रपरिषदेला हरीश देशमुख, सुरेश झुरमुरे, प्रशांत सपाटे, छाया सावरकर, आदी उपस्थित होते.
आयोजकांवरही गुन्हा दाखल व्हावा
अशा भोंदूबाबांचे कार्यक्रम आयोजित करून सामान्य नागरिकांना अंधश्रद्धेत ढकलणाऱ्या आयोजकांवरही कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
– अंनिस करणार आंदोलन, १९ ला जाहीर सभा
जादूटोणा विरोधी कायद्याची अंमलबजाणी व्हावी, यासाठी अंनिसतर्फे आंदोलन केले जाईल. याची सुरुवात येत्या १९ जानेवारी रोजी जाहीर सभेने केली जाईल. श्री गुरुदेव सेवाश्रम येथे सायंकाळी ६ वाजता आयोजित या सभेत धीरेंद्र कृष्ण महाराजांची पोलखोल केली जाईल. तेव्हापर्यंत पोलिसांनी कारवाई केली तर ठीक, नाही तर त्यांचीही पोलखोल करू, असेही त्यांनी सांगितले.