देशभरासह जळगावात रोलेट, फन टार्गेट गेम सर्रासपणे सुरू पोलीस अधीक्षक यांच्यासह जळगाव शहर पोलीसांचे दुर्लक्ष ?
यावल अमीर पटेल
: देशभरासह जळगावात रोलेट, फन टार्गेट गेम सर्रासपणे सुरू झाला आहे याकडे मात्र जिल्हा
पोलीस अधीक्षक यांच्यासह जळगाव शहर पोलीसांचे दुर्लक्ष ? होत असल्याचा आरोप संपूर्ण जळगाव शहर परिसरातून होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की जळगाव शहरातील सट्टा,पत्ता हा काही नवीन राहिलेला नाही त्यातच आता ऑनलाईन जुगारची भर पडली आहे. देशभरात अनेक ठिकाणी सुरु असलेला रोलेट,फन टार्गेट ऑनलाइन गेम आता जळगावात सुरू झाला आहे. यामुळे समाजात तीव्र चिंता व्यक्त करण्यात येत आहे पोलिसांनी वेळीच कारवाई न केल्यास कर्जबाजारीपणामुळे अनेकांचा बळी जाऊ शकतो.
जळगाव जिल्ह्यात सट्टा,पत्ता हा नेहमीचा विषय असला तरी आता थेट पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर ऑनलाईन जुगाराचा नवीन अड्डा सुरू झाला आहे. जुगाराचा नवीन सुरू झालेला अड्डा पोलिसांच्या गोपनीय विभागाला समजला नाही का? पोलिसांचे खबरे सुद्धा निष्क्रिय झाले आहेत का? इत्यादी सह अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. नाशिकसह अनेक ठिकाणी मोठा वाद उभा राहिलेला रोलेट आणि फन गेम जळगावात सुरू झाला आहे.
दोन्ही गेमचे व्यसन फार मोठे सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या घातक तर आहेच परंतु सोबतच ‘दस का दम’ हा ऑनलाईन गेम देखील जळगावात सर्रासपणे सुरू झाला आहे. नाशिकमध्ये एक तरुण शेतकरी या गेममध्ये ४५ लाख रुपये हरला तर एकाने ३० लाख गमावल्याने आत्महत्या केली. पोलिसांनी या प्रकरणात नाशिक येथील कैलास शहा या मास्टर माईंडला देखील पोलिसांनी अटक केली होती.
‘दस का दम’ मध्ये एक २० रुपयांच्या डावला १०० रुपये मिळतात तर फन टार्गेटमध्ये एका गेमला ९ ते ३६ रुपये मिळतात. शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर जुने बस स्थानक शेजारील गल्लीत ३ दुकानात हा गेम सुरू आहे.
ऑनलाईन पद्धतीने खेळला जाणाऱ्या या गेमचा निकाल अवघ्या १ मिनिटात येत असतो आणि दिवसभर हा खेळ सुरू असतो यात अनेक तरुणांची नागरिकांची आर्थिक लुबाडणूक फसवणूक होत आहे,याकडे गुन्हे अन्वेषण विभागासह संपूर्ण पोलीस दलाचे अद्याप लक्ष का वेधले गेले की नाही हा प्रश्न उपस्थित केला जात असून पोलिसांच्या आशीर्वादानेच हा खेळ सुरू झाला असल्याचे संपूर्ण जळगाव परिसरात बोलले जात आहे.
एक ऑनलाईन आयडी तयार केल्यानंतर त्याद्वारे सर्व खेळ खेळले जातात. जळगावातील या अत्याधुनिक दोन नंबर खेळाचा मुख्य म्होरक्या कोण आणि त्याला आशीर्वाद कोणाकोणाचे याबाबत लोकप्रतिनिधींसह पोलिसांनी शोध घेणे गरजेचे असून त्याला पकडल्यास संपूर्ण साखळी समोर येऊ शकते.
जळगाव शहरातील पोलिसांनी आपल्या गोपनीय खात्यामार्फत तसेच खबऱ्यांमार्फत चौकशी तपास करून नवीन अत्याधुनिक खेळ तात्काळ बंद करावे अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.