तलाठी भरतीचा शुल्क कमी करा : नुमान चाऊस
लाखो तरुण-तरुणी ज्या तलाठी भरतीच्या प्रतीक्षेत होते ती अखेर निघाली आहे. अनेक वर्षांपासून ही भरती रखडलेली होती. विना-मुलाखत सरळसेवा भरती असल्यामुळे युवकांचा कल जास्त याच पदाकडे असतो. अनेक गरीब, कष्टाळू व गरजू युवक-युवती या सरळ सेवा भरतीचा आवेदन फॉर्म भरण्यास उत्सुक व तयार आहेत. परंतु शासनाने तलाठी भरतीच्या आवेदन अर्जाचे शुल्क अंदाजे पेक्षा खूपच जास्त ठेवले आहे. 2019 मध्ये झालेल्या भरतीचा शुल्क खुल्या प्रवर्गासाठी ₹500 होता पण आताच्या भरतीचा आवेदन शुल्क हजार रुपये आहे. अगोदरच प्रचंड बेरोजगारी व महागाई असल्यामुळे अनेक तरुणांकडे कमाईचा स्त्रोत नाही, अनेक तरुण-तरुणींकडे कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप नसल्यामुळे इंटरनेट कॅफेवर जाऊन पैसे मोजून फॉर्म भरावा लागतो तसेच अभ्यासासाठी पुस्तके खरेदी कराव्या लागतात. अनेक युवक युवतींसाठी ₹1000-900 शुल्क हे त्यांच्या आवाक्याच्या बाहेरचा आहे आणि या शुल्कामुळे अनेक इच्छुक युवक-युवती या भरतीपासून लांब राहण्याची दाट शक्यता आहे. म्हणूनच मौलाना आझाद युवा मंचचे जिल्हाअध्यक्ष नुमान अली चाऊस यांनी ही मागणी केली आहे की प्रत्येक भरतीचा आवेदन शुल्क जो जास्त ठेवलेला आहे शासनाने लवकरात लवकर आवेदन अर्जाची लिंक सुरू करण्यापूर्वी हा आवेदन शुल्क कमी करावा व प्रत्येक गरीब-गरजू युवक हा आवेदन अर्ज भरू शकेल याची काळजी घ्यावी.