दैनिक दिव्य लोकप्रभाचे उपसंपादक काझी अमान यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव !
काझी अमान है गेल्या ३५ वर्षांपासून वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत असून या कालावधीत त्यांनी दैनिक झुंजार नेता, दैनिक लोकमत (मराठी), दैनिक लोकमत समाचार (हिंदी), दैनिक भास्कर (हिंदी) आदी प्रमुख नामांकित वर्तमानपत्रात काम केले असून गेल्या दोन वर्षांपासून ते दैनिक दिव्य लोकप्रभामध्ये 'विशेष प्रतिनिधी' म्हणून कार्यरत आहेत. सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून पत्रकारिता केल्यामुळे त्यांना 'उत्कृष्ट वार्ता प्रथम पुरस्कारा'सह अनेक पारितोषिके मिळालेली आहेत. गेवराई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळलेली असून सध्या ते बीड जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत.विशेष म्हणजे काझी अमान यांचे शिक्षण मराठी माध्यमातून झालेले असताना उर्दू भाषिक विद्यार्थी-विद्यार्थिनींना आपल्या मातृभाषेतून शिक्षण मिळावे म्हणून बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे एकमेव असलेले उर्दू कन्या कनिष्ठ महाविद्यालयासह तालुक्यातील ग्रामीण भागात ठीक-ठिकाणी उर्दू शाळा सुरू करण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. अंजुमन निदा-ए-उर्दू या सेवाभावी संस्थेमार्फत गेवराई शहर व तालुक्यात त्यांनी विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविलेले आहेत. अशाप्रकारे सामाजिक क्षेत्रातही त्यांचे योगदान राहिलेले आहे. काझी अमान हे पत्रकारितेत आपली हयाती घालविलेले 'दर्पणकार पुरस्कार' प्राप्त गेवराई तालुक्याचे सर्वात ज्येष्ठ पत्रकार काझी हयातुल्ला यांचे ज्येष्ठ चिरंजीव असून आपल्या वडिलांचा निर्भीड व परखड पत्रकारितेचा वारसा ते यशस्वीपणे पुढे चालवीत आहेत. पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभवामुळे दिव्य लोकप्रभाचे मुख्य संपादक संतोष मानूरकर यांनी त्यांची दैनिकाचे उपसंपादक म्हणून नियुक्ती केली आहे. या नियुक्तीबद्दल विविध पक्ष, संस्था, संघटनांचे पदाधिकारी, विविध खात्याचे अधिकारी, कर्मचारी, सामाजिक, राजकीय कार्यकर्ते, डॉक्टर्स, वकील, इंजिनिअर, व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार बांधव अशाप्रकारे सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.