परळी तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची जोरदार मुसंडी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपला दिली जोरदार टक्कर
परळी प्रतिनिधी.
संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती निवडणुकीचे विशेष लक्ष असलेल्या परळी तालुक्यात वंचित बहुजन आघाडीने प्रथमच जोरदार मुसंडी मारत राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी या राष्ट्रीय पक्षांना टक्कर देत अनेक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत सदस्य निवडून आणले. तर महत्त्वाच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी मोठ्या प्रमाणात मतदान घेऊन आगामी काळात विधानसभा, लोकसभेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी निर्णायक ठरू शकते हे सिद्ध केले.
परळी तालुक्यातील अतिशय लक्षवेधी ठरलेल्या सिरसाळा, नाथ्रा, बेलंबा, आदी ग्रामपंचायत मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या सरपंच पदाच्या उमेदवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबरीने मतदान घेतल्याचे दिसून आले. वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक माजी खासदार ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार तसेच बीड जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे बीड जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत जोरदार तयारी केली व निवडणूक लढविल्या. त्याचा परिणाम सुद्धा वंचित बहुजन आघाडीला अनेक ठिकाणी यश मिळाल्याने दिसून आला. यामुळे जिल्ह्यात राजकीय खळबळ उडाली. असेच परळी तालुक्यात राजकीय अस्तित्व वंचित बहुजन आघाडीने निर्माण केले.
तालुक्यातील प्रतिष्ठेच्या माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे व भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजाताई मुंडे यांचे गाव असलेल्या नाथ्रा येथे वंचित बहुजन आघाडीचे गौतम आदमाने यांनी 200 मते घेऊन वंचित बहुजन आघाडी तालुक्यात भक्कम असल्याचे दाखवून दिले. नाथ्रा येथे भाजपा राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवून विजयी झाले. परंतु वंचित बहुजन आघाडीमुळे ग्रामपंचायत बिनविरोध काढण्याचे स्वप्न धुळीला मिळाले.
अतिशय अटीतटीच्या सरपंच पदासाठी झालेल्या सिरसाळा ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला 1228 मते मिळाली तर वंचित बहुजन आघाडीचे अशोक शेप यांना 12 14 मते मिळाली यावरून वंचित बहुजन आघाडीची ताकद परळी तालुक्यात वाढल्याचे स्पष्ट होत आहे. बेलंबा येथे राजेश सरवदे यांनीही विजयी भाजपाला जोरदार टक्कर दिली. फक्त 90 मताने त्यांचा पराभव झाला.
परळी तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये मध्ये वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र पॅनल उभे करून निवडणुका लढवल्या. तर लोणारवाडी येथे त्यांचे शाखाप्रमुख बाबासाहेब मुंडे यांच्या पत्नी संघमित्रा बाबासाहेब मुंडे यांना पुरस्कृत केले होते. लोणारवाडी त्या सरपंच पदासाठी विजय झाल्या. तसेच तालुक्यातील मालेवाडी ग्रामपंचायत मध्ये नऊपैकी तीन सदस्य वंचित बहुजन आघाडीचे विजयी झाले. यामध्ये जनाबाई बाबुराव कसबे, गौतम संदिपान कसबे, रवीना बाबासाहेब पोटभरे, या विजय झाल्या. तर बेलंबा येथे सत्यभामाबाई जिवन गीते, कनेरवाडी सत्वशीला प्रसेनजीत रोडे, बोरखेड येथे दयानंद देशमाने तर नागापूर येथे सुरेखाबाई माणिक बनसोडे या विजयी झाल्या.
परळी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते मिलिंद घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तर बालासाहेब जगतकर गौतम साळवे यांच्या नेतृत्वाखाली जो अभिनव प्रयोग झाला. हा प्रयोग ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून तालुक्यामध्ये यशस्वी झाल्याचे दिसून आले. आंबेडकरी समाजाने प्रस्थापित नेत्यांच्या व पक्षांच्या पाठीमागे न राहता खंबीरपणे मिलिंद घाडगे यांच्या पाठीशी उभे राहून वंचित बहुजन आघाडीला जे मतदान केले यावरून परळी तालुक्यात मिलिंद घाडगे यांच्या रूपाने मजबूत होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. परळी तालुक्यात रिपाईचे दिवंगत नेते धम्मानंदजी मुंडे तसेच एन. के. आप्पा सरवदे यांच्या निधनानंतर आंबेडकरी समाजात नेतृत्वाची जी पोकळी निर्माण झाली होती. ती पोकळी मिलिंद घाडगे यांच्या रूपाने भरून आली आहे.
या विजयात वंचित बहुजन आघाडीचे प्रसिद्धीप्रमुख बालासाहेब जगतकर, गौतम साळवे, शहराध्यक्ष गफारखान, एजाज खान, विशाल जाधव राजू भूतके आदींनी परिश्रम घेतले. वंचित बहुजन आघाडीच्या राजकीय मुसंडीने प्रस्थापित पक्षांचे मात्र धाबे दणाणले आहेत.